मराठी | English
  Ashes Home Views Gallery Appeal Audio Books Blog Contact Us  
 
संक्षिप्त चरित्र
१९ मे १९१० रोजी, एका संस्कारक्षम कुटुंबात श्री. नथुराम गोडसे यांचा जन्म झाला. तल्लख बुद्धिमत्ता आणि  चौकसवृत्ती याचे वरदान लाभलेल्या नथुरामाला हिंदुत्वाचा विलक्षण अभिमान वाटे. हिंदुधर्म, त्याचा इतिहास आणि हिंदू संस्कृती याचा गाढा अभ्यास त्यांनी केला होता. परंतु त्यांच्या हिंदुत्ववादी कणखर बाण्यामध्ये दांभिकपणा आणि धर्मांधतेचा लवलेशही नव्हता. म्हणूनच तारुण्यात पदार्पण करत असतानाच ते अस्पृश्यता निवारणासाठी आणि केवळ जन्मावर आधारित अशा जातिभेदाच्या निर्मूलनसाठी झटले.

शालान्त परीक्षेला पोहेचेपर्यंत त्यांनी स्वतःला पूर्णपणे राष्ट्राकार्यासाठी झोकून दिले होते. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. 
वाचन दांडगे होते. दादाभाई नौरोजी, विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांचे साहित्य त्यांनी वाचले होते.
तसेच भारताच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासा बरोबरच त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि इतर प्रमुख देशांचा इतिहास अभ्यासला होता. समाजवाद आणि साम्यवाद यांच्या प्रचलित तत्वांबद्दल त्यांचे सखोल वाचन होते. परंतु या सर्वांपेक्षाही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधीजी यांची वक्तव्ये आणि लेख यांचा फार जवळून अभ्यास त्यांनी केला होता.

ह्या सर्व वाचन आणि चिंतन याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांना मनापासून असे वाटते की, एक देशप्रेमी या नात्याने हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र यांची सेवा करणे हेच त्यांचे आद्य कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन करण्यासाठी आणि जिला ते आपले दैवत मानत अशा मातृभूमीसाठी १५ नोव्हेंबर १९४९ रोजी त्यांनी हौतात्म्य स्वीकारले आणि इहलोकाची यात्रा संपवली.
परंतु त्यांचे विचार अमर आहेत आणि ते विचार देशाभिमानी हिंदुसाठी सदैव प्रेरणादाई ठरतील......